Bookmark

Bookmark this Blog

Monday, April 20, 2015

धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब उर्फ महर्षी कर्वे

धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब उर्फ महर्षी कर्वे यांची आज १५८ वी जयंती :

 
> धोंडो केशव कर्वे (एप्रिल १८, इ.स. १८५८ - नोव्हेंबर ९, इ.स. १९६२)महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपलं १०४ वर्षांचं जीवन वाहिलेल्या धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब उर्फ महर्षी कर्वे यांचा जन्म १८ एप्रिल, इ.स. १८५८ साली रत्नागिरी जिह्याच्या खेड तालुक्यातील शेरावली या गावी एका निम्न मध्यमवर्गीय घरात झाला.

>`पद्मविभूषण' हा किताब त्यांना इ.स. १९५५ साली प्रदान करण्यात आला, तर लगेच इ.स. १९५८ साली त्यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान `भारतरत्न'ने सन्मानित करण्यात आले. 

>अनेक भारतीय विद्यापीठांनी त्यांना डी.लिट. देऊन सन्मानित केले ( सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी या विद्यापीठ, बनारस हिन्दू विश्वविद्यालय,   ).

>एकशेचार वर्षांचे दीर्घायुष्य देऊन निसर्गानेही त्यांना सन्मानित केले. पुण्यातच ९ नोव्हेंबर, इ.स. १९६२ ला त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

कार्य :

> स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे मराठी समाजसुधारक होते. इ.स. १९०७ साली त्यांनी महाराष्ट्रात पुण्याजवळील हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली.

> इ.स. १९०० मध्ये अनाथ बालिकाश्रमाचे स्थलांतर हिंगण्यास करण्यात आले. याच परिसरात अण्णांनी विधवांसाठी एक हक्काची सावली निर्माण केली. विधवांचे हे वसतिगृह ही एक सामाजिक प्रयोगशाळा होती.

>इ.स. १८९६मध्ये अण्णासाहेबांनी पुण्याजवळील हिंगणे (आता कर्वेनगर) या गावी विधवा महिलांसाठी आश्रम स्थापन केला. या आश्रमात याच ठिकाणी इ.स. १९०७ साली महिला विद्यालयाची स्थापना त्यांनी केली. अण्णासाहेबांची २० वर्षांची विधवा मेहुणी - पार्वतीबाई आठवले - या विद्यालयाच्या पहिल्या विद्यार्थिनी होत. आश्रम आणि शाळा या दोन्हींसाठी लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी त्यांनी '`निष्काम कर्म मठा'ची स्थापना इ.स. १९१० साली केली. पुढे या तिन्ही संस्थांचे कार्य उत्तरोत्तर वाढत गेल्याने त्याचे एकत्रीकरण करून `'हिंगणे स्त्री शिक्षण संस्था' आणि त्यानंतर `महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था' असे त्याचे नामकरण करण्यात आले.

>१९९६साली त्यांच्या कार्यारंभाला १०० वर्षे पूर्ण झाली म्हणून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था दरवर्षी शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करणाऱ्या स्त्रीला बाया कर्वे पुरस्कार देते.

>त्यांनी पुण्यात भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना झाली. पुढे विठ्ठलदास ठाकरसी यांनी १५ लाखांचे अनुदान दिल्याने या विद्यापीठाचे `श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ' (एसएनडीटी) असे नामकरण करण्यात आले.

>विधवा महिलांचे प्रश्न आणि त्यांचे शिक्षण यांव्यतिरिक्त जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता यांच्या विरोधातही त्यांनी कार्य केले.

>मराठी (आत्मवृत्त, इ.स. १९२८) आणि इंग्रजी (लुकिंग बॅक, इ.स. १९३६) अशा दोन्ही भाषांमध्ये त्यांनी आत्मचरित्र लिहिले.

>आजही `कर्वे स्त्री शिक्षण संस्था' दिमाखात उभी आहे, उत्तरोत्तर प्रगती करीत आहे.

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी या विद्यापीठ स्थापना :

>इ.स. १९१५ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय सामाजिक परिषदेचे अध्यक्षस्थान अण्णांनी भूषविले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी ‘महिला विद्यापीठ‘ या कल्पनेचा पुनरुच्चार केला. ३ जून, इ.स. १९१६ रोजी महिला विद्यापीठाची स्थापना झाली. स्त्रीशिक्षणाची ही धारा विद्यापीठाच्या रूपाने विस्तार पावली. 

>सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी आपल्या मातोश्री नाथीबाई ठाकरसी यांच्या स्मरणार्थ या विद्यापीठास १५ लाख रुपयांची देणगी दिली.

>या ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी‘ या विद्यापीठास सरकारने स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा दिला. अनेक प्रज्ञावंत महिलांनी विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषविले.

>अण्णांना अभिप्रेत असणारे बोधवाक्य विद्यापीठाने शिरोधार्य मानले ते असे- ‘संस्कृता स्त्री पराशक्तिः‘ अण्णांच्या प्रयत्नाने अस्तित्वात आलेल्या प्रत्येक संस्थेचे भरणपोषण केले.

>इंग्लंड, जर्मनी, जपान, अमेरिका या देशांना भेटी देऊन अण्णांनी आपल्या संस्थांची आणि संकल्पांची माहिती जगाला करून दिली. बर्लिनमध्ये असताना सापेक्षतावादाचे प्रणेते प्रा. अल्बर्ट आइनस्टाइन यांची त्यांनी भेट घेतली. त्यांनी बर्लिनमधली गृहविज्ञानशाळा पाहिली. टोकियोतील महिला विद्यापीठ पाहिले. अनेक राष्ट्रांत स्त्रियांनी चालविलेल्या संस्था पाहिल्या. त्या दर्शनाने सुचलेल्या अनेक नव्या योजना त्यांनी पूर्णत्वास नेल्या.

No comments:

Post a Comment