चालू घडामोडी (10 ऑक्टोबर 2015)
"नॅशनल डायलॉग क्वार्टलेट" संस्थेला यंदाचे शांततेचे नोबेल पोरतोषिक जाहीर :
ट्युनिशियामध्ये 2011 मध्ये झालेल्या मोठ्या आंदोलनानंतर अराजकतेच्या उंबरठ्यावर असलेल्या या देशात लोकशाही टिकविण्यात भरीव कामगिरी केलेल्या "नॅशनल डायलॉग क्वार्टलेट" या संस्थेला यंदाचे शांततेचे नोबेल पोरतोषिक जाहीर झाले आहे.
ट्युनिशियामध्ये झालेल्या या सकारात्मक बदलाचा आदर्श इतर देशांनीही घ्यावा, यासाठीही हे पारितोषिक दिले असल्याचे नोबेल निवड समितीने म्हटले आहे.
ट्युनिशियातील चार प्रमुख संस्थांची मिळून द क्वार्टलेट ही संस्था बनली आहे.
यामध्ये द ट्युनिशियन जनरल लेबर युनियन, द ट्युनिशियन कॉन्फडरेशन ऑफ इंडस्ट्री ट्रेड अँड हॅंडिक्राफ्ट्स, द ट्युनिशियन ह्युमन राइट्स लीग आणि द ट्युनिशियन ऑर्डर ऑफ लॉयर्स यांचा समावेश आहे.
या सर्व संस्थाद्वारे ट्युनिशियातील विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या नागरिकांमध्ये मानवाधिकार, कायद्याचे पालन, समाजकल्याण अशा मूल्यांचा प्रसार केला जातो.
द क्वार्टलेट या संस्थेने आपल्या नैतिक सामर्थ्याच्या जोरावर ट्युनिशियामध्ये शांततापूर्ण मार्गाने लोकशाहीचा विकास होण्यासाठी प्रमुख माध्यम म्हणून काम केले असल्याचे निवड समितीने पारितोषिक जाहीर करताना म्हटले आहे.
द क्वार्टलेटसह इतर क्षेत्रातील नोबेल मिळालेल्या सर्व विजेत्यांना 10 डिसेंबरला पारितोषिक वितरण होणार आहे.
चार संस्थांनी मिळून बनलेल्या या संस्थेची स्थापना 2013 ला करण्यात आली.
राजकीय हत्यासत्र आणि देशात पसरलेल्या अराजकतेमुळे लोकशाही प्रक्रिया संकटात सापडली असल्याच्या पार्श्वभूमीवर ही स्थापना झाली होती.
जस्मिन रिव्होलुशन
ट्युनिशियामध्ये 2010 मध्ये सरकारविरोधी वातावरण तयार होऊन ही लाट सर्व अरबजगतात पसरली.
म्हणूनच उठावांना "अरब स्प्रिंग" म्हणूनही ओळखले जाते.
ट्युनिशियामध्ये याला "जस्मिन रिव्होलुशन" म्हणतात.
शेतकऱ्यांसाठी मोबाईल ऍप सुविधा निर्माण करण्याचा निर्णय :
बदलते हवामान, शेतीमालांचे बाजारभाव, कृषी विद्यापीठे आणि तज्ज्ञांनी केलेले नवीन प्रयोग आणि शेतीसंदर्भातील अन्य महत्त्वाच्या घडामोडी समजण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोबाईल ऍप सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबतची माहिती कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी दिली.
सध्या हवामानात सातत्याने बदल होत असल्याने पारंपरिक शेती व्यवसाय अनेकदा संकटात सापडत आहे.
बदलत्या हवामानाच्या अधारे शेतकऱ्यांनी पीकपद्धतीत बदल करणे आवश्यक असून, यासाठी जिल्हा व तालुकास्तरावरील कृषी अधिकारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
शेतकऱ्यांनाही घरबसल्या सर्व बदलांची माहिती मिळणे आवश्यक असल्याने सरकारने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
याबाबत येत्या डिसेंबर 2015 अखेरपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना "सॉईल कार्ड" देण्यात येईल.
या कार्डामध्ये संबंधित शेतकऱ्याच्या शेतजमिनीच्या परिस्थितीचा तपशील असेल.
यावरून शेतकऱ्यांनी कोणती पिके घ्यावीत आणि त्यासाठी कोणत्या खतांचा वापर करावा याबाबत कृषी अधिकारी मार्गदर्शन करतील.
मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वेचे "ऍप" :
मुंबईतील रेल्वे प्रवाशांना यापुढे तिकिटासाठी किंवा मासिक पाससाठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही.
रेल्वेचे "ऍप", ज्याद्वारे मोबाईलवरच अनारक्षित प्रवास तिकीट, मासिक पास आणि प्लॅटफॉर्म तिकीट घेता येईल.
या "पेपरलेस" सेवेचे उद्घाटन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज केले.
तसेच विनातिकीट प्रवास करून रेल्वेचा महसूल बुडविणाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी आगामी सहा महिन्यांत मोठी मोहीम राबविली जाईल, अशीही घोषणा त्यांनी केली.
सुरवातीच्या टप्प्यात पेपरलेस प्लॅटफॉर्म तिकिट सेवा मुंबईत छत्रपती शिवाजी टर्मिनस, दादर सेंट्रल, पनवेल, ठाणे, लोकमान्य टिळक टर्मिनस, अंधेरी, मुंबई सेंट्रल, बोरिवली, दादर पश्चिम, वसई रोड, वांद्रे त्याचप्रमाणे नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन या मध्य, पश्चिम आणि उत्तर रेल्वेच्या स्थानकांसाठी सुरू करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेच्या सर्व उपनगरीय स्थानकांवर (मुंबई) मोबाईल ऍपद्वारे प्रवाशांना अनारक्षित रेल्वे तिकीट आणि मासिक पास या ऍपद्वारे घेता येईल.
दिल्लीत नवी दिल्ली ते पलवल या स्थानकांदरम्यानच्या मासिक पासधारकांना मोबाईलवर ही सेवा मिळेल.
'गुगल प्ले स्टोअर' किंवा 'विंड स्टोअर'वरून हे ऍप डाउनलोड करता येईल.
ज्येष्ठ संगीतकार व गीतकार रवींद्र जैन यांचे निधन :
'सौदागर', "फकिरा", "गीत गाता चल", "अखियों के झरोंको से", "राम तेरी गंगा मैली", "हीना", "चितचोर", "तपस्या", "चोर मचाये शोर", "दुल्हन वही जो पिया मन भाये" अशा अनेक चित्रपटांना सुमधुर संगीताने सजवणारे ज्येष्ठ संगीतकार व गीतकार रवींद्र जैन यांचे निधन झाले.
ते 71 वर्षांचे होते.
संगीत क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल याच वर्षी त्यांना "पद्मश्री"ने सन्मानित करण्यात आले.
तसेच उत्तर प्रदेश सरकारनेही त्यांचा सत्कार केला होता.
अणू शास्त्रज्ञ डॉ. शेखर बसू यांची अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती :
भारताच्या पहिल्या जल अणुभट्टीच्या शिल्पकारांपैकी एक असलेले प्रसिद्ध अणू शास्त्रज्ञ डॉ. शेखर बसू यांची शुक्रवारी केंद्रीय सचिव आणि अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांना या पदावर अवघ्या 11 महिन्यांचा कार्यकाळ लाभणार आहे.
डॉ. बसू सध्या भाभा अणू संशोधन केंद्रात (बीएआरसी) संचालक असून, अणू पुनर्वापर मंडळाचे (एनआरबी) मुख्य कार्यकारी आहेत.
सध्या अणू कार्यक्रमाचे प्रमुख असलेले डॉ. आर.के. सिन्हा 23 ऑक्टोबर रोजी निवृत्त होत असून, त्यांच्याकडून बसू सूत्रे हाती घेतील.
कल्पक्कम येथील इंदिरा गांधी अणू संशोधन केंद्रात टाकाऊ पदार्थ व्यवस्थापन पुन:प्रक्रिया सुविधा प्रकल्प स्थापन करण्यात डॉ. बसूंची मुख्य भूमिका आहे.
एक स्वतंत्र पाणी योजना मंजूर :
मुख्यमंत्र्यांच्या नावाने राज्याच्या ग्रामीण भागासाठी एक स्वतंत्र पाणी योजना मंजूर होईल, असे आश्वासन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले.
स्वच्छ भारत मिशन(ग्रामीण) अंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी दोन दिवसीय आत्मसन्मान कार्यशाळा पुण्यात बालेवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे.
आराखडा बनवून राज्याने स्वत:ची मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा योजना तयार केली आहे.
त्यासाठी 1 हजार कोटी मागितले आहेत.
त्याला तत्त्वत: मंजुरीही मिळाली आहे. पुरवणी बजेटमध्ये त्याला निधी मिळेल.
त्यानंतर लवकरच राज्याची ही योजना कार्यान्वीत होईल.
लेखिका शशी देशपांडे यांचा साहित्य अकादमीच्या जनरल कौन्सिलचा राजीनामा :
कानडी लेखक एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येबाबत मौन पाळण्यात आल्यावरून तीव्र नाराजी व्यक्त करून साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका शशी देशपांडे यांनी शुक्रवारी साहित्य अकादमीच्या जनरल कौन्सिलचा राजीनामा दिला.
देशपांडे ह्या अनेक कादंबऱ्या, लघुकथा आणि निबंध संग्रहाच्या लेखिका आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या आहेत.
2009 मध्ये पद्मश्री पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
प्लुटोच्या वातावरणाची पहिली रंगीत छायाचित्रे :
प्लुटोच्या वातावरणाची पहिली रंगीत छायाचित्रे नासाच्या न्यू होरायझन्स यानाने पाठवली असून त्यात बर्फाळ बटू ग्रहावर निळे आकाश दिसत आहे.
प्लुटोच्या पृष्ठभागावर बर्फ दिसत आहे.
तेथील बर्फाळ धुक्याच्या कणांना राखाडी किंवा लाल रंग आहे, पण ज्या पद्धतीने ते निळा रंग पसरवतात त्यामुळे न्यू होरायझन्स मोहिमेचे वैज्ञानिक चकित झाले आहेत.
एसडब्ल्यूआरआय या संस्थेचे संशोधक कार्ली हॉवेट यांच्या मते त्या निळ्या रंगातून आपल्याला धुक्याच्या सदृश कणांची व्याप्ती व संरचना कळू शकते.आकाश हे काही लहान कणांनी नेहमी सूर्यकिरण विखुरले गेल्याने निळे दिसते.
पृथ्वीवर नायट्रोजनच्या लहान रेणूंनी सूर्यकिरण पसरले जाऊन आकाश निळे दिसते, तर प्लुटोवरही आकाश काजळीसारख्या थोलिन या कणांमुळे निळे दिसते.
वैज्ञानिकांच्या मते प्लुटोच्या वातावरणातील अगदी वरच्या थरात थोलिनचे कण असतात तेथे अतिनील किरणांचे विघटन होते व त्यातून नायट्रोजन व मिथेनचे रेणू तयार होतात.
ते एकमेकांशी अभिक्रिया करतात. त्यामुळे धन व ऋणभारित आयन तयार होतात.
ते पुन्हा एकत्र आल्यानंतर स्थूलरेणू तयार होतात.
अशी क्रिया शनीचा चंद्र असलेल्या टायटन या उपग्रहावर दिसून आली आहे.
अधिक गुंतागुंतीचे रेणू एकत्र येऊन त्याचे छोटे कण बनतात.
अस्थिर वायूंचे संघनन होते व ते त्या कणांच्या पृष्ठभागावर बसतात त्यामुळे बर्फाचे कण असल्यासारखे धुके दिसते, त्यामुळे प्लुटोच्या लालसर रंगातही भर पडते.
न्यू होरायझन्स यानाने केलेल्या संशोधनानुसार प्लुटोच्या अनेक भागात बर्फ आहे.
राल्फ स्पेक्ट्रल कंपोझिशन मॅपरने ते शोधले आहे.
प्लुटोच्या विस्तारित भागात सरसकट बर्फ दिसत नाही, कारण तिथे अतिशय तरल अशा बर्फाचे थर आहेत.
न्यू होरायझन्स अवकाशयान पृथ्वीपासून 5 अब्ज किलोमीटर दूर आहे, त्यातील सर्व प्रणाली व्यवस्थित काम करीत आहेत.
No comments:
Post a Comment