Bookmark

Bookmark this Blog

Monday, October 12, 2015

Economics

Economics:

हल्लीच्या बातम्यांमधे आर्थिक घडामोडीच्या बातम्यांना प्रमुख स्थान मिळू लागले आहे. या बातम्या स्टॉक मार्केटशी संबंधीत तरी असतात किंवा रिझर्व्ह बँकेच्या संबधीत तरी असतात. रिझर्व्ह बँकेशी संबधीत असलेल्या बातम्या शक्यतो बँकेचे पत धोरण व रेपो रेट या संबधीत असतात. या बातम्या वाचताना Repo Rate, CRR, SLR, Reverse Repo Rate असे शब्द वाचण्यात येत असतात व या शब्दांचा आपल्या अर्थव्यवस्थेवर काही ना काही तरी परिणाम होत असतो एवढे आपल्याला कळते पण याचा नक्की अर्थ काय हे बरेच जणांना समजत नसते. (मी पण त्यातलाच एक आहे). नुकताच पुण्याच्या सकाळचे संपादक श्री, मुकुंद लेले यांचा एक लेख माझ्या वाचनात आला. मला हा लेख फार आवडला. मूळ लेख इंग्रजीमधे असून तो सान्ता व बांन्ता यांच्या संवादात आहे. मी या लेखाचे स्वैर मराठी रुपांतर केले असून सान्ता बान्ताच्या जागी मराठीतील ‘काळू-बाळू’ ही लोकप्रीय जोडी घेतली आहे. श्री. लेले यांच्या लेखामुळे माझ्या बर्या च शंकांचे निरसन झाले तसेच आपल्या पण शंकांचे निरसन व्हावे हाच या लेखाचा मूळ हेतू आहे.

काळूः- 
मी ऐकले आहे कि मि. राजन यांनी रेपो रेट (Repo Rate) 50 बेसिक पॉईन्ट्सनी कमी केला आहे. सगळेजण म्हणत आहेत की मार्केटच्या दृष्टीने ही एक चांगली गोष्ट आहे. कर्जाचे हप्ते पण ( Loan EMI) कमी होतील. हा ‘रेट कट’ म्हणजे नक्की काय? मला हे जरा समजाऊन घ्यायचे आहे.
बाळूः- 
हे समजावून घेण्याआधी तुला बँका कशा काम करतात हे समजावून घेणे आवश्यक आहे.
काळूः-
का?
बाळूः- 
कारण याचा बँकांच्या कामकाजाशी फार जवळचा संबंध आहे. मला सांग बँका काय काम करत असतात?
काळूः- 
बँका डिपॉझीटर्सकडून पैसे गोळा करत असतात व तेच पैसे कर्ज रुपाने देऊन त्यावर व्याज कमवत असतात. अशा पद्धतीने ते सगळ्यांना खूष ठेवत असतात व वर प्रॉफिट पण कमवत असतात.
बाळूः- 
बरोबर! पण या ठिकाणी अजुन काही गोष्टी असतात. मी अगदी साध्या भाषेत तुला समजाऊन सांगायचा प्रयत्न करतो. बँकेला पैसा हवा असतो. बँक तुझ्या किंवा माझ्यासारख्या डिपॉझीटर्सकडून पैसे गोळा करू शकते, तसेच आर. बी. आय.( म्हणजे रिझर्व बँक ऑफ इंडिया) यांचेकडून पण पैसे घेऊ शकते. अर्थात यासाठी बँकेला डिपॉझिटरला तसेच आर.बी.आय. ला काही ना काहीतरी व्याज हे द्यावेच लागते. 
काळूः- 
बर मग?
बाळूः- 
यासाठी जेव्हा आपण बँकेमधे 100 रुपये डिपॉझीट म्हणून ठेवतो त्याचे पुढे काय होते हे आपण समजावून घेणे आवश्यक आहे. 
काळूः- 
मला ठाऊक आहे. बँक तेच 100 रुपये कर्जरुपाने ज्याला गरज आहे त्याला देते! 
बाळूः-
नाही! हे एवढे सोपे नसते. कारण बँक जरी कर्ज देत असली तरी त्यात मोठी जोखीम असते. कर्ज बुडू शकते. अशा अनेक केसेस घडलेल्या आहेत. यामधे बँकेचे पैसे बुडू शकतात. त्यामूळे बँक त्यांचेकडे असलेला सगळाच पैसा अशा प्रकारच्या ‘हाय रिस्क’ क्षेत्रात वापरू शकत नाही. या पैशांना काहीतरी संरक्षण आवश्यक असते. कारण किती झाले तरी हा लोकांचा पैसा असतो. तो सुरक्षीत रहायलाच हवा नाही का?
काळूः- 
होय पण ते कसे?
बाळूः-
आर. बी. आय ने प्रत्येक बँकेसाठी एक गोष्ट अनिवार्य केली आहे. आलेल्या प्रत्येक 100 रुपये डिपॉझिटपैकी 4 रुपये रिझर्व बँकेकडे करंट अकाऊंटमधे ठेवायचे. यावर काही व्याज मिळत नाही. याला ‘कॅश रिझर्व्ह रेशो’ (CRR) म्हणतात जो सध्या 4 टक्के आहे.

काळूः-
अस? मग पुढे काय होत?
बाळूः- 
त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांसाठी अजून एक गोष्ट अनिवार्य केलेली आहे. बँककडे डिपॉझिटच्या रुपाने आलेल्या प्रत्येक 100 रुपयांमधील 21 रुपये 50 पैसे एवढी गुंतवणूक सरकारी कर्जरोख्यांमधे करणे आवश्यक आहे. अर्थातच यावर बँकेला काहीतरी व्याज मिळतच असते. याला ‘स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो’ (SLR) म्हणतात जो सध्या 21.5 टक्के आहे.
काळूः- 
याचा अर्थ बँकेकडे आलेल्या 100 रुपयांपैकी बँकेकडे खर्च करायला किंवा कर्ज देण्यासाठी फक्त 74 रुपये 50 पैसेच उरतात? 
बाळूः- 
बरोबर आहे. सिआरआर चे 4रुपये अधिक एसएलआर चे 21 रुपये 50 पैसे म्हझजे टोटल 25 रुपये 50 पैसे हे 100 रुपयांतून वजा केले तर 74 रुपये 50 पैसे उरतात. 
काळूः- 
पण तु असे म्हणालास की बँक रिझर्व्ह बँकेकडून पण कर्ज घेऊ शकते. मग यासाठी बँकेला किती व्याज द्यावे लागते?
बाळूः-
30 सप्टेंबर 2015 पर्यंत बँका रिझर्व्ह बेँकडून घेतलेल्या पैशांसाठी 8.25 टक्के दराने व्याज द्यावे लागायचे. आता हा व्याज दर 50 पॉईन्ट्स नी कमी करण्यात आला आहे. आता बँकेला 7.75 टक्के दराने रिझर्व्ह बँकेला व्याज द्यावे लागेल. यालाच ‘रेपो रेट’ (Repo Rate) असे म्हणतात.
काळूः-
रेपो रेट कमी झाल्यामूळे बँकेच्या फिक्स डिपॉझीटच्या व्याजदरावर काही परिणाम होईल का?
बाळूः-
हो अगदी बरोबर आहे. जर बँकेला पुर्वीपेक्षा कमी व्याजदराने पैसे मिळत असतील तर त्यांनी डिपॉझिटर्सना जास्त दराने व्याज का म्हणून द्यावे? पुष्कळ बँकांनी एक वर्षाच्या मुदतीच्या डिपॉझिटचा व्याजदर कमी केला असून तो 7.75 टक्के किंवा त्याच्या आसपास केला आहे. 
काळूः- 
आता जर बँकांना कमी व्याजाने पैसा मिळू लागला आहे तर त्यांनी कर्जासाठीचे व्याजदर कमी करायला हवेत व याचा फायदा लोकांना म्हणजे जनतेला मिळवून द्यायलायला हवा!
बाळूः- 
होय तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. व्याजदर कमी होतील अशी शक्यता वाटू लागल्यामूळे मार्केटमधे आनंदी वातावरण आहे. उद्योजकांना कमी व्याजाने कर्ज मिळू लागले तर त्यांना त्यांच्या उद्योग धंद्यात भरीव वाढ करणे शक्य होणार आहे. त्यामूळे नवीन नोकर्यां उपलब्ध होऊन बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल, त्यांच्या फायद्यामधे वाढ होईल व त्यामूळे एकूणच अर्थव्यवस्थेला बळकटी येईल!
काळूः-
पण त्यामुळे महागाई कमी होईल का?
बाळूः-
हे बघ! त्याचे असे आहे की कर्जावरचे व्याजदर कमी झाले की लोक जास्त कर्ज घ्यायला उत्सुक असतात. याचा अर्थ लोकांकडे खर्च करायला किंवा खरेदी करायला जास्त पैसा उपलब्ध होईल. त्यामूळे मार्केटमधली मागणी वाढेल. पण जर त्याप्रमाणात मालाचा पुरवठा झाला नाही तर किंमती वाढू शकतील. 
काळूः- 
याचा अर्थ यामुळे महागाई वाढू शकेल!
बाळूः-
होय वाढू शकेल! पण महागाई वाढण्याची ईतर बरीच कारणे असतात. जसे उत्पादन (औद्योगीक उत्पादन व शेतीचे उत्पादन), आयात-निर्यात, परदेशी चलनाचा पुरवठा वगैरे. त्यामूळे महागाई वाढेल किंवा वाढणार पण नाही!
काळूः- 
आता शेवटचा प्रश्न! ज्याप्रमाणे आपण आपले पैसे बँकेमधे डिपॉझिट म्हणून ठेऊ शकतो त्याप्रमाणे बँक पण त्यांचे पैसे डिपॉझीट म्हणून ठेऊ शकतात का?
बाळूः-
होय! बँका त्यांचे पैसे रिझर्व्ह बेँकडे डिपॉझीट म्हणून ठेऊन त्यावर व्याज मिळवू शकतात. हे व्याज सर्वसाधारणपणे रेपो रेट (Repo Rate) पेक्षा एक टक्याने कमी असते. याला ‘रिव्हर्स रिपो रेट’ (Reverse Repo Rate) म्हणतात. 
काळूः-
वा वा! आज मला कळले की रिपो रेट, सीअरअर, एसएलआर, रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय व त्याचे काय परिणाम होत असतात. 
बाळूः-
धन्यवाद

(श्री. मुकुंद लेले, संपादक, सकाळ यांच्या सौजन्याने)

_______________________________

No comments:

Post a Comment