Bookmark

Bookmark this Blog

Sunday, November 1, 2015

चालु घडामोडी ४९

चालू घडामोडी (31 ऑक्टोबर 2015) :

रशिया भारताला आणखी पाणबुडी देण्यास तयार :

दोन देशांमधील संबंध वाढविण्याच्या दृष्टीने रशिया भारताला आणखी एक पाणबुडी भाडेतत्त्वावर देण्यास तयार असल्याचे संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.
 संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर हे आजपासून रशियाच्या दौऱ्यावर असल्याच्या पार्श्‍वभूमीवर हे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.
 पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डिसेंबर महिन्यात रशिया दौऱ्यावर जात असून, त्यादरम्यान पाणबुडीबाबतचा करार पूर्ण होण्याची शक्‍यता आहे.
 तसेच, कामोव्ह का-226 हेलिकॉप्टरची संयुक्तपणे निर्मिती करणे आणि एस-400 क्षेपणास्त्र प्रणाली विकत घेणे या करारांवरही अंतिम चर्चा होऊन मोदींच्या दौऱ्यावेळी हे करार होणार असल्याचे पर्रीकर यांनी सूचित केले.
 डिसेंबरमध्ये होणाऱ्या वार्षिक बैठकीसाठी मोदी रशियाला जाणार असून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतील.

सरदार विनोदांवर बंदी आणण्याबाबत निर्णय :

विनोदांमध्ये "सरदार" हे नेहमीच करमणुकीचे साधन ठरत असून त्यांच्यावरील विनोद हे खरोखरच मानहानीकारक आणि वांशिक आहेत का याचा सर्वोच्च न्यायालय अभ्यास करणार असून त्यानंतर अशा विनोदांवर बंदी आणण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
 एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयात सरदारांवरील विनोदाबाबत याचिका दाखल केली आहे.
 याचिकेमध्ये 5 हजार पेक्षा अधिक संकेतस्थळांवर सरदारांबाबत विनोद असल्याचे म्हटले आहे.
 तसेच त्यामुळे या समाजातील सदस्यांचा अवमान होत असल्याचेही म्हटले आहे.
 तसेच सरदारांना मूर्ख आणि कमी बुद्धीचे का समजण्यात येते, याबाबत जाणून घेण्यास याचिकाकर्ता इच्छुक असल्याचे याचिकेवरून आढळून येत आहे.
 सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी हस्तक्षेप करून सरदारांवरील विनोदांवर बंदी आणण्याची मागणी याचिकेत केली आहे.
 दरम्यान न्यायालयाने असे विनोद खरोखरच मानहानीकारक आणि वांशिक आहेत का याचा अभ्यास करणार असल्याचे म्हटले आहे.

केंद्र सरकारने राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा लाभ अनिवासी भारतीयांना देण्याचा निर्णय :

केंद्र सरकारने राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा लाभ अनिवासी भारतीयांना देण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने एका सूचनेद्वारे माहिती दिली आहे.
 गुंतवणुकीचा एक पर्याय म्हणून अनिवासी भारतीयांना यापुढे परकीय चलन विनिमय व्यवस्थापन कायदा 1999 अंतर्गत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत गुंतवणूक करता येणार आहे.
 विशेष म्हणजे या गुंतवणूकीतून मिळालेले उत्पन्न केवळ भारतातच खर्च करण्याचे बंधन लादण्यात आलेले नाही.
 या योजनेचे नियमन राष्ट्रीय निवृत्तीवेतन यंत्रणेसह निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे करण्यात येणार आहे.
 देशवासीयांना निवृत्तीनंतर उत्पन्न सुरु रहावे या हेतूने 1 जानेवारी 2004 पासून राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आली आहे.
 तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठीही ही योजना खुली आहे.

सुधींद्र कुलकर्णी हे खुर्शिद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनासाठी पाकिस्तान दौऱयावर :

'ऑब्जर्व्हर रिसर्च फाउंडेशन'चे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी हे पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शिद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनासाठी पुढील आठवड्यात पाकिस्तान दौऱयावर जाणार आहेत.
 पाकिस्तानमध्येही या पुस्तकाचे पुन्हा प्रकाशन होणार आहे.
 कसुरी यांच्या 'नीदर अ हॉक, नॉर अ डव्ह - ऍन इनसाइडर्स अकाउंट ऑफ पाकिस्तान फॉरिन पॉलिसी' या पुस्तकाचे मुंबईमध्ये कडेकोट बंदोबस्तामध्ये प्रकाशन झाले आहे.
 यापुस्तक प्रकाशनाला शिवसेनेने विरोध केला होता.

येत्या शैक्षणिक वर्षापासून शिक्षण शुल्क नियमन कायद्याची कठोर अंमलबजावणी :

येत्या शैक्षणिक वर्षापासून शिक्षण शुल्क नियमन कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जाईल.
 या कायद्यानुसार शुल्क न आकारणाऱ्या शैक्षणिक संस्थांविरुद्ध सक्त कारवाई केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

श्री हंसरत्न विजयजी महाराज तप पूर्ण करणार :

गेल्या अडीच हजार वर्षांत कोणत्याही साधू किंवा साध्वीजींना न जमलेले 'गुणरत्न संवत्सर तप' रविवारी पूर्णत्वाला पोहोचणार आहे.
 श्री हंसरत्न विजयजी महाराज हे तप पूर्ण करणार असून हा 'पारणा' महोत्सव 1 नोव्हेंबरला सकाळी आठ वाजता वांद्रे-कुर्ला संकुल येथील एमएमआरडीए मैदानात पार पडणार आहे.
 या जागतिक विक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो अनुयायी उपस्थित राहण्याची शक्यता आयोजकांनी व्यक्त केली आहे.
 भगवान महावीर यांच्या काळात पाच जैन साधू महाराजांनी हा उपवास यशस्वीरीत्या पूर्ण केला होता.
 त्यानंतर अडीच हजार वर्षांनंतर ही कठीण तपस्या पूर्णत्वास येत असल्याचा दावा गुणरत्न संवत्सर तप पारणा महोत्सव कमिटीने केला आहे.
 या तपात तपस्या करणाऱ्या व्यक्तीला उपवासाच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी सहा वाजेदरम्यान केवळ गरम पाणी पिण्याची मुभा असते.
 तर सायंकाळी सहा ते सकाळी 10 वाजेपर्यंत पाणीही पिता येत नाही.
 कोणताही प्रवास अनवाणीच करावा लागतो. त्यासाठी प्रचंड इच्छाशक्तीसह शरीरावर, मनावर आणि आत्म्यावर नियंत्रण लागते.

ब्राझीलिया आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'दी सायलेन्स'ची भरारी :

ब्राझीलिया आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गजेंद्र अहिरेंच्या 'दी सायलेन्स'ने भरारी घेतली आहे.
 मेक्सिको, बेल्जियम, पॅराग्वे, जर्मनी, बल्गेरिया, क्यूबा, अर्जेंटिना या देशातल्या चित्रपटांबरोबर यंदा पहिल्यांदा भारत स्पर्धा करणार आहे.
 एकंदर आठ चित्रपटांची स्पर्धा या ब्राझीलिया आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणार आहे.
 6 ते 15 नोव्हेंबरदरम्यान ब्राझीलमध्ये होणाऱ्या या चित्रपट महोत्सवात प्रेक्षकांना 'दी सायलेन्स'चा आनंद घेता येणार आहे.
 या चित्रपटासाठी गजेंद्र अहिरेंना जर्मन स्टार ऑफ इंडिया 2015 च्या 'डायरेक्टर्स व्हिजन' पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

सानिया, मार्टिना डब्ल्यूटीए फायनल्सच्या उपांत्य फेरीत :

जागतिक टेनिसमधील अव्वल महिला जोडी सानिया मिर्झा - मार्टिना हिंगीस यांनी आपला धडाकेबाज खेळ कायम राखताना डब्ल्यूटीए फायनल्सच्या उपांत्य फेरीत धडक मारली.
 विशेष म्हणजे सानिया - हिंगीस जोडीने सलग 20 सामन्यात विजय मिळवण्याचा पराक्रम केला आहे.
 उपांत्य सामन्यातही सानिया - हिंगीस जोडीने आपला धडाका कायम राखताना हंगेरीच्या टिमीया बाबोस आणि फ्रान्सच्या क्रिस्टीना मालडेनोविच यांचा सरळ दोन सेटमध्ये 6-4, 7-5 असा पराभव केला.
 गतवर्षी झिम्बाब्वेच्या कॅरा ब्लॅकच्या साथीने खेळताना सानियाने डब्ल्यूटीए फायनल्समध्ये महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते.

 

No comments:

Post a Comment