चालू घडामोडी (6 ऑक्टोबर 2015)
वैद्यकशास्त्राचे नोबेल जाहीर :
मानवी शरीरामध्ये असलेल्या परजीवी कृमींवर उपचार शोधून काढणारे आर्यलडचे विल्यम कॅम्पबेल, जपानचे सातोशी ओमुरा आणि मलेरियाच्या परोपजिवी जंतूवर उपाय शोधणाऱ्या चीनच्या श्रीमती योउयू तू यांना वैद्यकशास्त्राचे नोबेल जाहीर करण्यात आले आहे.
मानवी शरीरातील गोल कृमींवर उपचारपद्धती कॅम्पबेल व ओमुरा यांनी शोधून काढली, तर तू यांनी मलेरियावर (हिवताप) उपचार शोधले आहेत, त्यांच्या या योगदानासाठी त्यांची निवड करण्यात आली असल्याचे स्वीडनच्या कॅरोलिन्स्का इन्स्टिटय़ूटने म्हटले आहे.
या दोन्ही शोधांनी मानवाला रोगांशी लढण्याचे मोठे शस्त्र मिळाले आहे, हजारो-लाखो लोकांना या रोगांचा प्रादुर्भाव दर वर्षी होतो.
त्यांना आता चांगले उपचार मिळतील असे नोबेल समितीने म्हटले आहे.
नोबेलची रक्कम 9 लाख 50 हजार डॉलर आहे.
विल्यम कॅम्पबेल यांचा जन्म आर्यलडमध्ये सन 1930 मध्ये झाला.
ते अमेरिकेतील न्यूजर्सी येथे ड्रय़ू विद्यापीठात कार्यरत आहेत, तर सातोशी ओमुरा यांचा जन्म 1935 मध्ये जपानमध्ये झाला असून ते टोकियोतील किटासाटो विद्यापीठात संशोधन करीत आहेत.
चीनच्या श्रीमती योउयू तू या 'चायना अॅकॅडमी ऑफ ट्रॅडिशनल चायनीज मेडिसीन' या संस्थेत काम करीत आहेत.
कॅम्पबेल व ओमुरा यांनी अवेरमेकटिन नावाचे औषध तयार केले असून, रिव्हर ब्लाइंडनेस व लिंफॅटिक फिलॅरियासिस (हत्तीरोग) या रोगांवर त्याचा उपयोग होतो.
रिव्हर ब्लाइंडनेसमध्ये त्वचाविकार होतो व त्याच्या संसर्गजन्य जंतूने अंधत्व येते. तू यांनी आर्टेमिसिनिन हे मलेरियावरचे औषध शोधले आहे.
जर्मनी व भारत यांच्यात समझोता करारांवर स्वाक्षऱ्या :
जर्मन कंपन्यांच्या उद्योगांना ताबडतोब मान्यता व 1 अब्ज युरोचा सौरऊर्जा निधी यासह एकूण 18 करारांवर जर्मनी व भारत यांच्यात समझोता करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल यांच्यात चर्चा झाल्यानंतर हे करार करण्यात आले.
भारत-जर्मनी यांच्यात आंतर सरकारी सल्लामसलतीच्या तिसऱ्या शिखर बैठकीत मोदी व मर्केल यांनी संरक्षण, सुरक्षा, गुप्तचर, रेल्वे, व्यापार, गुंतवणूक, स्वच्छ ऊर्जा या विषयांवर चर्चा केली.
जर्मनीत आधुनिक भारतीय भाषांना उत्तेजन, भारतात परदेशी भाषा शिक्षणात जर्मन भाषेला मोठे स्थान देणे याबाबतही करार झाले.
तसेच संरक्षण उत्पादन तंत्रज्ञान, गुप्तचर माहिती व दहशतवाद, मूलतत्त्ववादाचा मुकाबला या मुद्दय़ांवर दोन्ही देश सहकार्य करणार आहेत.
कोलंबिया विद्यापीठाचे संशोधन :
आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यापासून जवळच फोगो ज्वालामुखीचे स्खलन झाले होते व त्यानंतर तेथून 55 कि.मी. अंतरावर असलेल्या केप वेर्दी बेटांवर 73 हजार वर्षांपूर्वी 800 फूट उंचीच्या त्सुनामी लाटा उसळल्या होत्या याचे पुरावे वैज्ञानिकांना मिळाले आहेत.
आता या अॅटलांटिकमधील या ज्वालामुखीच्या 2829 मीटर उंचीवर असलेल्या शिखराचे स्खलन होण्याची शक्यता असून त्यात 2004 मधील त्सुनामीच्या 11 पट अधिक लोक मरू शकतात.
2004 मध्ये 2 लाख 80 हजार लोक आग्नेय आशियात मरण पावले होते.
आताच्या लाटा 270 मीटर उंचीच्या असतील असेही सांगण्यात आले, कारण समुद्रसपाटीपासूनची पातळी कमी झाली आहे.
केप वेर्दी बेटांवरील सँटियागो या आफ्रिकेतील पश्चिम किनारी भागात संशोधन करण्यात आले.
रामलो व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मते सँटियागो येथे 2000 फुटांचे दगड सापडले असून ते समुद्र सपाटीपासून 650 फूट अंतरावर होते.
काही दगड हे 25 फूट रुंद व 770 टन वजनाचे होते.
भारतीय तरुणाने मोडला चिनी युवकाचा गेल्या दहा वर्षांचा विक्रम :
गणितातील 'पाय'च्या किमतीतील दशांशानंतरच्या 70 हजार स्थानांवरील आकडे तोंडपाठ करणाऱ्या 21 वर्षे वयाच्या एका भारतीय तरुणाने चिनी युवकाचा गेल्या दहा वर्षांचा विक्रम मोडून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे.
राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्य़ातील मोहोचा खेडय़ात राहणारा राजीव मीणा याने गेल्या मार्च महिन्यात 'पाय'च्या किमतीच्या दशांशानंतरचे 70 हजार आकडे 9 तास 27 मिनिटांत म्हणून दाखवत हा रेकॉर्ड स्थापित केला होता.
यासाठी त्याला गिनीज बुकचे स्मरणशक्तीसाठीचे प्रमाणपत्र 1 ऑक्टोबरला देण्यात आले.
पायची लक्षात ठेवलेली दशांशानंतरची सर्वाधिक स्थाने 70 हजार असून, भारतातील वेल्लोरच्या व्हीआयटी विद्यापीठात शिकणाऱ्या राजीव मीणा याने हे 21 मार्च 2015 रोजी हे साध्य केले आहे.
हे आकडे म्हणण्यासाठी लागलेले सुमारे 10 तास तो डोळ्यांवर पट्टी बांधून होता.
इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ प्रमाणपत्र व पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणार :
माहिती अधिकार कायद्याचे सामाजिक महत्त्व लक्षात घेऊन इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ त्या विषयात प्रमाणपत्र व पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणार आहे.
केंद्रीय माहिती आयुक्तालयाच्या माध्यमातून हे अभ्यासक्रम तयार करून ते राबवले जाणार आहेत.
सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना या अभ्यासक्रमाच्या परीक्षा उत्तीर्ण होणे सक्तीचे राहील.
यासाठी कैद्यांनाही प्रवेश खुला आहे.
पत्रकारही या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतील.
जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या गोमांस बंदीवर स्थगिती :
जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या गोमांस बंदी लागू करण्याच्या आदेशास सर्वोच्च न्यायालयाने दोन महिने स्थगिती दिली.
किंबहुना हा आदेश निलंबित ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान गोमांस बंदीबाबत काश्मीरमधील खंडपीठांनी परस्परविरोधी निर्णय दिल्याच्या प्रकरणी तीन सदस्यांचे खास पीठ स्थापन करण्याचा आदेश जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना दिला आहे.
सरन्यायाधीश एच.एल.दत्तू यांनी गोमांस बंदी आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या उच्च न्यायालयाच्या 8 सप्टेंबरच्या आदेशास दोन महिने स्थगिती दिली आहे.
रणबीर दंड संहितेच्या आधारे जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या जम्मू पीठाने गोमांस बंदीची अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला होता तर श्रीनगर खंडपीठाने गोमांस बंदी लागू करता येणार नाही असा निकाल दिला होता.
स्मार्ट सिटी"च्या आराखड्यातील लोकसहभागाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू :
मनामनांतील स्मार्ट शहराची संकल्पना साकारण्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या "स्मार्ट सिटी"च्या आराखड्यातील लोकसहभागाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होत आहे.
वाहतूक, पाणी, घनकचरा, पर्यावरण, सुरक्षितता आदी विषयांवर ऑनलाइन पद्धतीने पुणेकरांचा कौल घेऊन शहर "नंबर वन" करण्यासाठी महापालिका पावले टाकणार आहे.
सुमारे सव्वातीन लाखांहून अधिक कुटुंबांनी त्यात "स्मार्ट सिटी"ची कल्पना कशी असावी, हे स्पष्ट करणारे फॉर्म भरून महापालिकेला दिले.
या सर्वेक्षणातून वाहतूक आणि दळणवळण, पाणी व मलनिस्सारण, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण, सुरक्षितता, ऊर्जा व वीजपुरवठा हे विभाग स्मार्ट सिटीसाठी अत्यावश्यक असल्याचे पुणेकरांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय सेवा योजनेतील युवक, बचत गटांच्या समूह संघटिका, सिंबायोसिससह अन्य महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि महापालिका कर्मचारी आदी सुमारे 800 जण या सर्वेक्षणात सहभागी होणार आहेत.
त्याशिवाय नागरिकांना ते राहत असलेल्या भागात नजीकच्या महा-ई-सेवा केंद्रातील संगणकांवर, महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांतही www.punesmartcity.in या संकेतस्थळावर मत व्यक्त करता येणार आहे.
ऑनलाइन सर्वेक्षणाची मोहीम 12 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.
किसान ऍप" हा नवा प्रकल्प चाचणी तत्त्वावर सुरू :
दुष्काळ व गारपिटीच्या अस्मानी संकटाने भरडलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी विम्याची रक्कम लवकरात लवकर व पारदर्शीपणे मिळावी, यासाठी केंद्र सरकारने नुकसानाचे शास्त्रशुद्ध मूल्यमापन करणारा "किसान ऍप" हा नवा प्रकल्प चाचणी तत्त्वावर सुरू केला. याच्या पहिल्या चार लाभार्थी जिल्ह्यांत यवतमाळचा समावेश आहे, असे केंद्रीय कृषी राज्यमंत्री संजीवकुमार बालियान यांनी आज सांगितले.
हे नवे ऍप अँड्रॉइड प्रणालीने कार्यरत राहील.
या नव्या ऍपमुळे नैसर्गिक संकटात नुकसान सोसावे लागलेल्या व अनेकदा मरण कवटाळणाऱ्या शेतकऱ्याला विमा रकमेची भरपाई त्वरित; म्हणजे शक्यतो त्याच हंगामात मिळू शकेल.
हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो), नॅशनल क्रॉप फोरकास्ट सेंटर, भारतीय हवामानशास्त्र विभाग, केंद्र व राज्यांची कृषी मंत्रालये व कृषी विभाग, रिमोट सेन्सिंग सेंटर्स, कृषी व अन्नसुरक्षा विभाग (सीसीएएफएस) या विभागांच्या मार्फत संयुक्तरीत्या राबविण्यात येईल.
हे किसान ऍप शेतकरीही आपल्या मोबाईलवर डाउनलोड करू शकतील.
सरकारने चार लाभार्थी जिल्हे आज जाहीर केले असले तरी पहिल्या टप्प्यात सरकारने आठ जिल्हे निवडले असून, घोषणा न झालेल्यांत यवतमाळसह राज्यातील नगर व सोलापूर जिल्ह्यांचाही समावेश करण्यात आल्याचे समजते.
स्वित्झर्लंड लवकरच नागरिकांच्या खात्यांची सूची जाहीर करणार :
स्वित्झर्लंड लवकरच गेल्या 60 वर्षांत कोणताही हक्क न सांगितलेल्या भारतीय तसेच इतर देशांच्या नागरिकांच्या खात्यांची सूची जाहीर करणार आहे.
स्वित्झर्लंडमधील बँकांमध्ये असलेल्या अश्या खात्यांची सूची डिसेंबरमध्ये जाहीर करण्यात येणार आहे.
स्वित्झर्लंडने अश्या खातेधारकांचा तपशील गेल्या अनेक वर्षांपासून गुप्त ठेवला आहे.
मात्र, आता तेथील खात्यांचा तपशील जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सर्व स्वित्झर्लंडच्या बँकांकडून माहिती संकलित केल्यानंतर स्विस बॅंकिंग लोकपाल सर्व तपशिल जाहीर करणार आहे.
तसेच त्या खात्यांच्या हक्कदारांना (लाभार्थी) हक्क सादर करण्यासाठी संधी दिली जाणार आहे.
ही खाती 1955 पासून निष्क्रिय पडून आहेत.
स्विस बँकर्स असोसिएशन, स्वित्झर्लंडमधील हक्क न सांगितलेल्या खात्यांच्या तपशीलात खातेधारकाचे आडनाव, नाव, जन्म तारीख, राष्ट्रीयत्व व खातेदाराचा त्यावेळचा ज्ञात पत्त्याचा समावेश असणार आहे.
परंतू डिसेंबरमध्ये जाहीर करण्यात येणार्या सूचीमध्ये खात्यातील संपत्ती, बॅंकेचे नाव जाहीर करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस हॉनररी डॉक्टरेट या पदवीने सन्मान करणार :
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जपानमधील ओसाका सिटी विद्यापीठ हॉनररी डॉक्टरेट या पदवीने सन्मान करणार आहे.
हा या विद्यापीठाचा सर्वोच्च सन्मान असून या पुरस्काराने गौरवण्यात येणारे फडणवीस हे पहिले भारतीय आहेत.
ओसामा सिटी विद्यापीठाला 120 वर्षांची परंपरा असून आत्तापर्यंत या विद्यापीठाने जगातील अवघ्या 10 व्यक्तिंना हॉनररी डॉक्टरेट पदवीने गौरवलेले आहे.
महाराष्ट्रात सामाजिक व आर्थिक विकासासाठी सुधारणांची प्रक्रिया सुरू करण्याचे काम फडणवीसांनी सुरू केल्यामुळे त्यांना गौरवण्यात येत असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.
विद्यापीठाने हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी तसेच विद्यापीठामध्ये आपले विचार मांडण्यासाठी आणि विद्यार्थी व जपानी नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित केले आहे.
No comments:
Post a Comment